हिमायतनगर नगर पंचायतमध्ये सविकृत नगरसेवकपदासाठी चुरस
तीघांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष

हिमायतनगर नगर पंचायतची निवडणूक पार पडली असून, नगराध्यक्षांसह एकूण ९ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत. त्यामुळे हिमायतनगर नगर पंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे. लवकरच सत्ता स्थापन होणार असल्याने आता सविकृत नगरसेवक पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या पदासाठी सध्या तीन प्रमुख नावांची चर्चा हिमायतनगरमध्ये होत आहे.
सय्यद अजिम उर्फ अजिम हिंदुस्तानी सविकृत नगरसेवक पदासाठी आघाडीवर असलेले नाव म्हणजे अजिम हिंदुस्तानी. त्यांचे वडील सय्यद अब्दुल्ला यांनी सन १९७९ मध्ये हिमायतनगर येथे काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती. सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय विकासात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. हिमायतनगर तालुका निर्मितीसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली.
तसेच कोर्ट, तहसील कार्यालय व भारतीय स्टेट बँक हिमायतनगरमध्ये आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हिमायतनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘हिमायतनगर भूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणालाही राजकीय पद न मिळाल्याने, त्यांच्या लहान चिरंजीव सय्यद अजिम यांना सविकृत नगरसेवक करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
शेख हनिफ सर हिमायतनगरमधील कणखर, तडफदार व निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून शेख हनिफ सर यांचे नावही चर्चेत आहे. ते खाजगी शिक्षक असून स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस चालवतात. त्यांचे बंधू BSF मध्ये देशसेवा करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी BSF, पोलीस दल व विविध शासकीय सेवांमध्ये भरती झाले आहेत. त्यामुळे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, सविकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे नावही जोरात पुढे येत आहे.
खालिद मतीन गेल्या २० वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले खालिद मतीन यांचे नावही चर्चेत आहे. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून ते पक्षाचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात.
नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी प्रचारात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे सविकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे नावही प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार?
या तिघांपैकी कोणालाही सविकृत नगरसेवक करण्यात आल्यास, सर्वसामान्य व निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याला न्याय मिळेल, अशी भावना हिमायतनगरच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आता काँग्रेस नेतृत्व कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



