भाजपने पद्मशाली समाजाला डवले; फक्त मतांसाठी वापर – शिवसेना (उबठा) नेत्याचा आरोप
नांदेड दक्षिणचे प्रभाग क्रमांक 14 निरीक्षक व उपजिल्हा संघटक गजानन साहेबराव हारकरे पाटील यांचा भाजपवर आरोप

नांदेड – “भाजप पक्ष फक्त निवडणुकीच्या काळात पद्मशाली समाजाची आठवण काढतो, पण सत्तेतील किंवा पक्षाच्या जबाबदारीच्या वाटपात मात्र त्यांना कायम डावलतो,” असा घणाघात आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रभाग क्रमांक 14 निरीक्षक व उपजिल्हा संघटक गजानन साहेबराव हारकरे पाटील यांनी केला आहे.
हारकरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नांदेड शहरातील भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीत पद्मशाली समाजातील एकाही कार्यकर्त्याला स्थान देण्यात आले नाही. शहरात मोठ्या संख्येने असणारा आणि निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा पद्मशाली समाज असा दुर्लक्षित होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
“निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते पद्मशाली समाजाच्या दारोदार फिरून मतांची याचना करतात, नेत्यांकडे विशेष प्रेमाने भेट देतात; मात्र निवडणूक संपताच आणि सत्ता किंवा पदांचे वाटप येताच त्यांना पूर्णपणे विसरतात,” असा आरोप करत हारकरे पाटील म्हणाले, “हे दुहेरी धोरण आता पद्मशाली समाजाने ओळखण्याची वेळ आली आहे.”
ते पुढे म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष पुन्हा तयारीला लागला आहे, पण पद्मशाली समाजातील कुणालाच संधी न देणे हा त्यांच्या वागणुकीचा नमुना आहे. त्यामुळे या समाजबांधवांनी एकजूट होऊन भाजपला धडा शिकवावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.



