आष्टूरच्या जि.प. हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षांचा पाया घालणारा अभिनव उपक्रम
तयारी स्पर्धा परीक्षेची उपक्रमातून घडतोय उद्याचा प्रशासक

सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन; विद्यार्थी-पालक-ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड,१९- स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता, अभ्यासाची सवय आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन शालेय जीवनापासूनच घडावा, या हेतूने लोहा तालुक्यातील आष्टूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तयारी स्पर्धा परीक्षेची हा भविष्याचा वेध घेणारा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचा मजबूत पाया विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे.

हा उपक्रम यंदा सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात येत असून, शाळेतील गुणवंत व आदर्श शिक्षक डॉ. वसंत गंगाधरराव लुंगारे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तो साकार होत आहे. उपक्रमांतर्गत दररोज फलकावर सामान्य ज्ञानाचे पाच प्रश्न लिहिले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने सामान्य ज्ञानासाठी स्वतंत्र वही तयार केली असून, रिकाम्या वेळेत विद्यार्थी हे प्रश्न लिहून घेतात व पाठांतर करतात. दररोज परिपाठाच्या वेळी प्रश्नांची उजळणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना रोज दहा प्रश्न विचारले जातात, ज्याला विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उत्तरे देतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्मरणशक्ती व विषयावरील पकड अधिक मजबूत होत आहे. दर महिन्याला उजळणी परीक्षा घेण्यात येते तर वर्षअखेरीस जानेवारी महिन्यात १०० गुणांची अंतिम परीक्षा घेतली जाते.
ही परीक्षा इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १० अशा दोन गटांत घेण्यात येते. प्रत्येक गटातून तीन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. समान गुण मिळाल्यास स्पर्धा अधिक चुरशीची होते. अशावेळी १० गुणांची स्वतंत्र तोंडी परीक्षा घेऊन अंतिम क्रमांक निश्चित केला जातो. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात येते. प्रारंभीच्या वर्षी शाळेतर्फे बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र उपक्रमाचे शैक्षणिक महत्व लक्षात घेऊन माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पाटील बाबर यांनी सर्व बक्षिसांची जबाबदारी स्वीकारली असून ते सातत्याने बक्षिसे देत आहेत. तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश बुद्धाजी बंडे यांनीही रोख रक्कम जाहीर करून उपक्रमास मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे पालकांमध्येही या उपक्रमाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी गोडी, सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय आणि आत्मविश्वास निर्माण होत असून, निश्चितच येथून उद्याचे प्रशासक, अधिकारी व जबाबदार नागरिक घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या अभिनव उपक्रमासाठी शाळेचे राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक आदर्श शिक्षक एस. के. टोम्पे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.



