रमजान महिन्यात अखंड वीजपुरवठ्याची मागणी, नांदेडमधील नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

नांदेड: रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात नियमित आणि अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी शहरातील अनेक नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या महिन्यात रोज पहाटे सहरी, सायंकाळी इफ्तार तसेच रात्री नमाजच्या वेळेस वीजपुरवठा सुरळीत असणे अत्यावश्यक असते. मात्र सध्या नांदेड शहरातील विविध भागांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना विशेषतः रमजानमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नगरसेवकांनी निदर्शनास आणले की, अनेक वेळा शुक्रवारी दुपारच्या नमाजपूर्वी लोड वाढल्याचे कारण देत काही भागांतील वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच मागील वर्षाच्या अनुभवावरून रमजान महिन्यात सहरी व इफ्तारच्या वेळी देखील वीज खंडित झाल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे धार्मिक विधी, घरगुती कामकाज बाधित होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती सर्वसामान्य ग्राहकांसाठी गैरसोयीची असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात मागणी करण्यात आली आहे की रमजान महिन्यात कोणत्याही कारणास्तव अनावश्यक वीज कपात करू नये. ओव्हरलोड होणाऱ्या फीडरची तातडीने दुरुस्ती व देखभाल करावी तसेच आवश्यक असल्यास नवीन फीडर बसवावेत. संबंधित कार्यकारी अभियंता (शहर विभाग) यांना नियमित, सुरळीत, अखंड व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
महावितरण प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
निवेदनावर सही करणाऱ्यांमध्ये सय्यद मुजीब सय्यद मुख्तार (गटनेते, वार्ड 13) सय्यद मोईन सय्यद मुख्तार (AIMIM), फिरोज खान लाला (AIMIM), मिर्झा अमजद बेग (AIMIM), अश्विनी दशरथ धोंगडे (नगरसेविका, वार्ड क्रमांक 13), अब्दुल लतीफ अब्दुल मजीद (नगरसेवक, वार्ड क्रमांक 13), खुरेशी रेहाना बेगम चांदपाशा (नगरसेविका, वार्ड क्रमांक 14), बेबी शाइस्ता मोहम्मद सलमान खान (नगरसेविका, वार्ड क्रमांक 12), आसिया बेगम अब्दुल हबीब बागवान (नगरसेविका, वार्ड क्रमांक 11), सय्यद फसीओद्दिन सय्यद वलिओद्दिन (नगरसेवक, वार्ड क्रमांक 11), अॅड. मोहम्मद नासेर अहमद (माजी नगरसेवक), शिफा तरन्नुम अब्दुल रऊफ (नगरसेविका, वार्ड क्रमांक 13), मुस्कान नाज सय्यद वाजिद (नगरसेविका, वार्ड क्रमांक 14), अल्कसेरी सुमय्या गुलफाशन सरहान अल कसेरी (नगरसेविका, वार्ड क्रमांक 15), मोहम्मद अल्ताफ हुसैन मोहम्मद युसुफ (नगरसेवक, वार्ड क्रमांक 12), सायमा खानम मोहम्मद इम्रान खान (नगरसेविका, वार्ड क्रमांक 11), मोहम्मद मसूद अहमद खान (नगरसेवक, वार्ड क्रमांक 11), अरशीद ए. गणे (माजी नगरसेवक), शमीम बेगम ए. हफीज (नगरसेविका, वार्ड क्रमांक 14), रहीम अहमद खान (AIMIM), अन्सार अहमद खान (AIMIM). यांच्यासह अनेक नगरसेवक व AIMIM पदाधिकारी यांचा समावेश आहे.



