श्री संजय कुमार श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांची आदिलाबाद – मुदखेड – पूर्णा रेल्वे विभागाची तपासणी

श्री संजय कुमार श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड विभागातील आदिलाबाद – मुदखेड – पूर्णा या रेल्वे विभागाची सविस्तर तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांच्यासोबत श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड हे उपस्थित होते. मुख्यालय व विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील संपूर्ण तपासणीदरम्यान महाव्यवस्थापकांसोबत होते.

महाव्यवस्थापकांनी आपल्या तपासणीची सुरुवात आदिलाबाद रेल्वे स्थानकापासून केली. येथे अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच क्रू लॉबी, संयुक्त क्रू रनिंग रूमची पाहणी करून कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा व सोयी तपासल्या. यावेळी आदिलाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री पायल शंकर यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. त्यानंतर विविध लोकप्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या.
महाव्यवस्थापकांनी आदिलाबाद – किनवट विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक २३ ची पाहणी करून गेट बूम, नोंदी, सुरक्षा साधने आदींची तपासणी केली. यानंतर त्यांनी गेटमनशी संवाद साधून कामकाज व कार्यस्थितीची माहिती घेतली.
श्री संजय कुमार श्रीवास्तव यांनी किनवट रेल्वे स्थानकाची सविस्तर तपासणी करताना प्रवासी सुविधा व उपलब्ध सोयींचा आढावा घेतला. त्यांनी तिथे तिकीट बुकिंग काऊंटर, प्रतीक्षालय, स्थानक अधीक्षक कार्यालय तसेच सर्क्युलेटिंग एरियाची पाहणी केली. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विभागीय अधिकाऱ्यांनी कामांची सविस्तर माहिती सादर केली. ठरवलेल्या कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी गती वाढवण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी दिल्या.
महाव्यवस्थापकांनी पुल क्रमांक ११० ची सखोल तपासणी करून सर्व सुरक्षा बाबींचा आढावा घेतला. त्यांनी वळण क्रमांक ४० येथे ट्रॅक देखभाल व सुरक्षिततेची पाहणी केली तसेच गँगमनशी संवाद साधला.
यानंतर श्री संजय कुमार श्रीवास्तव यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाची तपासणी करून अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेतला. पुढे त्यांनी भोकर व मुदखेड अमृत स्थानकांवरील पुनर्विकास कामांचीही पाहणी केली. तपासणीदरम्यान त्यांनी विविध लोकप्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला.
तसेच तपासणीदरम्यान महाव्यवस्थापकांनी पूर्णा अमृत स्थानकावरील सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेतला. प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पूर्णा रेल्वे स्थानकावर उपलब्ध वैद्यकीय मदत वाहन (एमआरव्ही) व अपघात मदत गाडी (एआरटी) यांच्या तयारी व सुविधांचीही त्यांनी तपासणी केली.



