संघटन सृजन अभियानाला गती : काँग्रेस चे केंद्रीय निरीक्षकांचा परभणी जिल्ह्यात दौरा, इच्छुकांशी थेट संवाद

परभणी – काँग्रेस पक्षाने देशभरात संघटना अधिक बळकट करण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस च्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात ३७ केंद्रीय निरीक्षक आणि १८३ वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून व्यापक संघटनात्मक पुनर्रचना सुरू आहे.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षक अझमतुल्लाह हुसैनी (चेअरमन, वक्फ बोर्ड, तेलंगणा), जितेंद्र देहाडे आणि दादासाहेब मुंढे हे फेज-III अंतर्गत दौऱ्यावर आहेत.
जाहीर कार्यक्रमानुसार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 3:00 वाजता पूर्णा येथे बैठक व संवाद होणार आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता जिंतूर येथे तर सायंकाळी 4:00 वाजता मानवत येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच अंतिम दिवशी, दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता आणि दुपारी 3:00 वाजता परभणी शहर येथे जिल्हाध्यक्ष काँग्रेस, शहर जिल्हाध्यक्ष इच्छुक तसेच इतर वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक (वन-टू-वन) संवाद साधण्यात येणार आहे.
या बैठकीत स्थानिक संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांचे मत व सूचना जाणून घेतल्या जाणार असून त्यानुसार जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष पदांसाठी योग्य नेतृत्वाची निवड करून सविस्तर अहवाल ऑल इंडिया काँग्रेस कमिटी कडे सादर करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जनतेशी जोडलेली होईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.



