नांदेड येथे नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता नांदेड, दि. २० जून २०२६

नांदेड विभागाच्या इतिहासात प्रथमच, नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक मा. श्री प्रदीप कामले यांच्या मान्यता व मार्गदर्शनाखाली दिनांक १५ ते २० जून २०२६ या कालावधीत सहा दिवसीय नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वे नागरी संरक्षण संघटनेतर्फे आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश नागरी संरक्षण स्वयंसेवकांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी व प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम करणे हा होता. या प्रशिक्षणामध्ये अग्निसुरक्षा, मूलभूत जीवनरक्षक उपाय (Basic Life Support), बचाव व सुटका तंत्र (Rescue and Extrication Techniques) तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयांवरील सैद्धांतिक मार्गदर्शनाबरोबरच सिकंदराबाद व नांदेड येथील अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड येथील नागरी संरक्षण विभागाचे विभागीय आपत्कालीन अधिकारी श्री श्रीनिवास सूर्यवंशी यांनी समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. तसेच नांदेडचे नागरी संरक्षण निरीक्षक श्री महारुद्र डिगोळे, श्री उत्तम जाधव, शिवाजी सूतारे सिकंदराबाद येथून आलेले वरिष्ठ नागरी संरक्षण निरीक्षक श्री सुधीर बाबु, श्री अब्दुल हकीम आणि श्री रामबाबू यांनी विशेष सहकार्य करून प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
समारोप समारंभाचे आयोजन नांदेड येथील डीआरएम परिषद सभागृहात करण्यात आले. यावेळी नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक मा. श्री प्रदिप कामले यांनी प्रशिक्षणार्थींच्या उत्साह व समर्पणाचे कौतुक केले तसेच आपत्ती व्यवस्थापनात शारीरिक तंदुरुस्ती, सततची तयारी आणि नियमित सराव यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, नांदेड श्री दीपचंद्र आर्य तसेच दक्षिण मध्य रेल्वे मजदूर युनियन (SCRMU), नांदेडचे सचिव श्री टी. मणी कुमार यांनीही उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन व जनसेवेमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
मान्यवरांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले आणि प्रशिक्षणा दरम्यान प्राप्त झालेले ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये रेल्वे प्रशासन तसेच समाजाच्या आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेला अधिक बळकटी देतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रशिक्षणार्थींना पारितोषिके व स्मृतिचिन्हांचे वितरण करून तसेच आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



