खडकपुरा खूनप्रकरणी पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कामगिरी

नांदेड, दि. २१ जून – वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपुरा येथे झालेल्या खूनप्रकरणातील पाच आरोपींना अवघ्या चार तासांत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांना यश आले आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मिर्झा शब्बीर बेग गफार बेग (३९, खडकपुरा), ऋषीकेश अनिल घुले (२३, शंकरनगर तरोडा खुर्द), सय्यद सुफीयान सय्यद जमीर (१९, देगलूर नाका), माधव भगवान कांबळे (२१, राहुल कॉलनी, तरोडा बु.) आणि मुस्ताक अहमद इसाक अहमद (२१, आसरानगर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शमीम शेख इसाक (रा. खडकपुरा) यांचा आरोपींनी जुन्या वादातून राग मनात धरून खून केला. सन २०२३ मधील एक प्रकरण मागे घेणे तसेच दर्गा हजरतशहा रहेमान आणि दुल्लेशहा रहेमान नगर मशिदीचे नायब मुतवल्ली म्हणून कामकाज पाहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी कट रचला. मध्यरात्री पिस्तुलातून गोळीबार करून तसेच तलवार आणि खंजीराने वार करत शेख शमीम यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि वजीराबादचे पोलीस निरीक्षक अजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान ६२ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच हजारो मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या सखोल तपासातून आरोपींची ओळख पटवून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महादेव पिंपळगाव (ता. अर्धापूर) परिसरात लपल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील तपास वजीराबाद पोलीस करीत आहेत.



