मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मुदखेडचा बुलंद पाठिंबा; सकल मराठा समाजाचे रास्ता रोको

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित मुदखेड शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बंद ठेवत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसह मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही उपस्थित समाजबांधवांनी दिला.

मुदखेड शहर बंदच्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठ व व्यावसायिक परिसरात दिवसभर शांतता दिसून आली. त्यानंतर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. यावेळी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ प्रमुख मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनस्थळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड, पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, हेड कॉन्स्टेबल बालवीर ठाकूर, हेड कॉन्स्टेबल भिसे, हेड कॉन्स्टेबल राठोड यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी तसेच २० होमगार्ड जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला. शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढून समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आंदोलकांनी व्यक्त केली



