मुस्लिम अॅडव्होकेट फोरमचा जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा
सहारनपूर येथील मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळांवर, संपत्तीवर आणि समाजातील नागरिकांवर होत असलेल्या कथित अत्याचारांविरोधात दिल्ली येथील जंतरमंतरवर १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला मुस्लिम अॅडव्होकेट फोरम, नांदेडने पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात फोरमच्या वतीने शासनाच्या निदर्शनास भावना आणून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात सहारनपूर येथील ११५ वर्षे जुन्या मशिदीच्या पाडकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता बुलडोझरच्या साहाय्याने सदर मशीद पाडण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे फोरमने म्हटले आहे.
भाजप सरकारच्या काळात मुस्लिम समाजातील नागरिकांवर मॉब लिंचिंगच्या घटना घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच बलात्काराच्या आरोपींच्या सत्काराच्या घटनांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये पूजा-अर्चा केली जाते, मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात, असा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत, सहारनपूर येथील मशीद शासकीय खर्चातून पुन्हा बांधून देण्यात यावी आणि पाडकामास जबाबदार व्यक्तींकडून खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम अॅडव्होकेट फोरमने केली आहे. या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



