क्राईम

विमा हडपण्यासाठी स्वतःचाच बनाव उघड; मूळ तक्रारदारासह तिघे अटकेत

ट्रक चोरीचा बनावट गुन्हा दाखल करून विम्याची रक्कम हडपण्याचा प्रयत्न; दोन लाखांची रोकड जप्त

 

 

नांदेड | १५ ऑक्टोबर २०२६ नांदेड शहर व परिसरात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ट्रक चोरीचा बनावट गुन्हा दाखल करून विम्याची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मूळ तक्रारदारासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी विजयकुमार गणपती कटाळे (वय ३०, रा. बामणी, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी उस्माननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कलंबर फाटा परिसरातील तोटेवाड यांच्या घरासमोरील रस्त्यावर उभा केलेला त्यांचा सुमारे १६ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा १४ टायरचा जुना ट्रक (क्रमांक एमएच ३८ एक्स ११२१) चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विष्णुपुरी दवाखाना परिसरात सापळा रचून ट्रकचालक बालाजी विनायक घोगरे (वय ३७, रा. बामणी, ता. कंधार) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान बालाजी घोगरे याने साथीदार माधव दत्तराम घोगरे याच्यासोबत मिळून ट्रक परस्पर विकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकचे तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते थकीत होते. आर्थिक अडचणीमुळे तसेच ट्रकचे हप्ते थकल्याने हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा सोलापूर येथे अपघात झाल्यानंतर मालकाने विम्याबाबत दुर्लक्ष केले होते. याच परिस्थितीचा फायदा घेत ट्रकचालकाने ‘आमेर लाला’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांना ट्रक विकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. ट्रक विकल्यानंतर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात मूळ तक्रारदार विजयकुमार कटाळे यांच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर बाबींचा तसेच संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *