वाल्मीक नगर ते देगलूर नाका चौक रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात
"महानगरपालिका अतिक्रमण विभाग अर्थपूर्णरित्या मूग गिळून गप्प"
नांदेड दि.19 नांदेड शहरातील सर्वात मोठा आणि प्रशस्त अशी ओळख असलेला मालटेकडी ते देगलूर नाका हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले आहे हे अतिक्रमण दुकानदार बंद पडलेली चार चाकी वाहने विविध भंगार सामान फेरीवाले यांनी केलेले आहे याकडे ना पोलीस प्रशासन लक्ष देत आहे नाही महानगरपालिका अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे नांदेड शहरात वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामध्ये देगलूर नाका परिसरात तर प्रचंड वाहतुकीचा ताण असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होत असते. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे. सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होतच असते.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण काढत नाही आणि वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरत देखील नाही त्यामुळे नांदेडची वाहतूक व्यवस्था ही भगवान भरोसेच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण वाहतूक कोंडी झाल्यानंतर सक्रियपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसणे दुरापास्त झाले आहे. मागील अनेक दिवसापासून देगलूर नाका ते वाल्मीक नगर मालटेकडी या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता दोन्हीही बाजूनी संकुचित करण्यात आला आहे त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सदरील रस्त्यावर अनेक फंक्शन हॉल आहेत महानगरपालिकेचा दवाखाना आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची रहदारी होत असते अतिक्रमणामुळे नागरिकांना रहदारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असतात.वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांना वारंवार निवेदने देऊन सदरील रस्त्यावरील स्थायी स्वरूपात असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी करून देखील महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस हे याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. आजही या रस्त्यावर बंद पडलेली चार चाकी वाहने फेरीवाले आणि दुकानदार यांनी प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून येते. याची अनेक वेळा तक्रार करून हे काढण्याची मागणी केली तरी देखील त्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
लवकरात लवकर या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला नाही तर दिनांक 5 मार्च 2025 रोजी देगलूर नाका चौरसत्यामध्ये रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख बशीर लाला, खदीर अहमद खुर्शीद अहमद,मोहम्मद जाकीर मोहम्मद हुसेन, अब्दुल हमीद मोहम्मद इस्माईल यांनी दिला आहे. आता या इशाऱ्यानंतर तरी महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस कुंभकर्णी झोपे मधून जागे होतात की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.



