पी एम श्री केंद्रीय विद्यालयात प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड:- उध्दव सरोदे – शहरातील डी.आर.एम कार्यालय दक्षिण मध्य रेल्वे नांदेड स्थित पी एम श्री केंद्रीय विद्यालयात दिनांक 09.04.2025 रोजी वर्ग 1 च्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.सत्र 2025-26 साठी वर्ग 1 ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यासाठी दिनांक 09.04.2025 रोजी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता.यामध्ये सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाने मुख्य गेट पासून नाचत गात संगीताच्या तालावर स्वागत करून मुलांच्या स्वागतासाठी कब बुलबुल संघाने सज्ज राहून,रंग बिरंगी फुगे उडवत मुलांना मुख्य द्वारा पर्यंत नेण्यात आले.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. अशोक विश्वकर्मा व मुख्याध्यापक श्री. राम शृंगारे यांनी मुलांचे व पालकांचे गुलाब पुष्प व पेन्सिल देवून स्वागत केले. शाळेच्या मुख्य द्वारावर सेल्फी पॉइंट बसविण्यात आला होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात प्राचार्य,मुख्याध्यापक व नवीन विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. इयत्ता 2 व 3 री च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मुलांचे मनोरंजनासह स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिक्षिका कु.पल्लवी फुलसे यांनी केले. या पश्चात उपस्थित पालकांना प्राचार्य श्री. अशोक विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले व मुख्याध्यापक श्री.राम शृंगारे यांनी केंद्रीय विद्यालय संबंधी सविस्तर माहिती व पुढील शैक्षणिक कार्यक्रमाची परिपूर्ण माहिती देवून सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून समाधान केले व नियोजनबध्द प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,नवीन प्रवेशित विद्यार्थ्याचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



