स्वच्छतेचा संदेश घेऊन ६९ वर्षांचे यशवंत कण्हेरे महाराष्ट्र दौऱ्यावर महात्मा फुले शाळेत केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नांदेड,१२- महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त नांदेडच्या बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूल येथे काल अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड, पुणे येथून आलेले ६९ वर्षीय यशवंत कण्हेरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. एस.आर. कदम व उपमुख्याध्यापक ए.आर. कल्याणकर यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले.
प्लास्टिक मुक्ती, प्रदूषण नियंत्रण, हेल्मेटचा वापर, कारच्या सीट बेल्टचा वापर, झाडे लावा-झाडे जगवा, प्लास्टिक बॉटल व थर्माकोलच्या वापराचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर कण्हेरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी चार्टच्या माध्यमातून संवाद अधिक प्रभावी केला व विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची घोषवाक्येही म्हणवून घेतली.
६९ व्या वर्षीही त्यांनी मोटरसायकलवरून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करत स्वच्छतेचा संदेश घेऊन लोकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या नांदेड भेटीनिमित्त शाळेमध्ये आयोजित स्वच्छता स्वभाव व स्वच्छता संस्कार या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



