नांदेडमध्ये महावीर चौक ते वजिराबाद चौक मार्गावरील अवैध अतिक्रमणावर धडक कारवाई
पोलीस व महापालिकेच्या समन्वयातून ९० हून अधिक अतिक्रमणांवर कारवाई; दोन ट्रक साहित्य जप्त

नांदेड – प्रतिनिधी / नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी, नांदेड पोलिस आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर चौक ते वजिराबाद चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर अवैध अतिक्रमण हटविण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार, आज दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक श्री. परमेश्वर कदम व वजिराबाद पोलिस ठाण्याच्या पथकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान सुमारे ९० हून अधिक अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. गाड्या, बॅनर, फलक आणि इतर साहित्य हटवून दोन ट्रक भरून माल जप्त करण्यात आला. तसेच रस्त्याच्या कडेला नियमबाह्यपणे लावलेल्या १० वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री. अजितपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त श्री. सोनसळे, फरहत बेग, वार्ड अधिकारी जाधव साहेब आणि ५० कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. पोलिस दलाकडून ४ अधिकारी आणि २० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अवैध अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.



