नांदेडच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात आता ‘नो पार्टी झोन’!
केक कापणं, डीजे वाजवणं आणि डब्बा पार्टीला रेड सिग्नल

नांदेड – नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानात आता कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच उद्यानात वाढदिवस साजरे करणे, डब्बा पार्टी घेणे व डीजे वाजविणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
हुतात्मा स्मारकाजवळ केक कापण्याचा आणि मांसाहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांनी उद्यानात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालणारे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सध्या वाढत्या उन्हामुळे आणि रविवारच्या गर्दीमुळे माता गुजरीजी विसावा उद्यान फुलले आहे. हे उद्यान नांदेडमधील एकमेव मोठे उद्यान असून, येथे मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. याच पवित्र ठिकाणी अलीकडे केक कापून वाढदिवस साजरे करण्याचा प्रकार समोर आला होता.
या प्रकारांवर कारवाई करताना आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तातडीने पावले उचलून, उद्यानात प्रवेश करताना खाद्यपदार्थ सोबत नेण्यावर बंदी लावली आहे.
युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरे करण्याचा ट्रेंड वाढला होता. यामुळे उद्यानाचे वातावरण बिघडत होते. आता वाढदिवस साजरा करणे, डीजे वाजविणे आणि डब्बा पार्टी करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
उद्यान अधीक्षक डॉ. बेग यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना शांतता आणि स्वच्छतेचा आनंद मिळेल. हिरव्यागार वातावरणाचा खराखुरा अनुभव घेता येईल.”



