नांदेड : जुन्या शहरातील चौफाळा परिसरात रोज हजारो लिटर पाणी वाया; मनपाचे दुर्लक्ष कायम

नांदेड – शहरातील जुना भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौफाळा परिसरात महापालिकेच्या पाण्याच्या वॉलमधून दररोज हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी गळून नाल्यात वाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती सुरू असूनही, महानगरपालिकेने अद्याप याकडे कोणतेही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही. पाण्याची टंचाई भासत असताना असे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. चौफाळा भागात पिण्याच्या पाण्याची नळ योजना असून, त्याच्या वॉलमधून होणाऱ्या गळतीमुळे शुद्ध पाणी थेट नाल्यात मिसळत आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे त्वरित लक्ष घालून गळती थांबवण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या गळती टाळण्यासाठी योग्य देखभाल व्यवस्था उभारावी, अशीही मागणी होत आहे.
महापालिकेने जर लवकरात लवकर याची दखल घेतली नाही, तर पाण्याच्या टंचाईच्या काळात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.



