राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेत रवी ढगे यांचे सिंगापूर अनुभवावर प्रभावी सादरीकरण

नांदेड, दि. १०- महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिर्डी येथे एक दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा २२ ते २७ मार्च दरम्यान झालेल्या सिंगापूर आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याच्या समृद्ध अनुभवावर आधारित होती. या कार्यशाळेत लोहा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील मुख्याध्यापक रवी ढगे यांनी सिंगापूरमधील शाळांमध्ये राबवले जाणारे सहशालेय उपक्रम व शैक्षणिक धोरणांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक संजय यादव, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक व नांदेडचे भूमिपुत्र राहुल रेखावार, अभ्यास दौऱ्याचे समन्वयक सहसंचालक सरोज जगताप, उपसंचालक ज्योती शिंदे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेसाठी सविस्तर व परिपूर्ण अहवालाचे लेखन नांदेड जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सिंगापूर येथील अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, वर्ग रचना, सहशालेय उपक्रम व शाळांमधील शिस्तबद्धता याविषयी सखोल माहिती यातून देण्यात आली.
शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांनी सिंगापूर अभ्यास दौऱ्यातील अनुभवातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शिक्षणाच्या गुणवत्तेत अधिक सुधारणा करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या शिक्षकांचे कौतुक करत, आपण आता आपल्या जिल्ह्याचे आयडियल शिक्षक म्हणून काम करा, असे आवाहन केले.
लवकरच सिंगापूर अभ्यास दौऱ्याच्या अनुभवावर आधारित सविस्तर ड्राफ्ट तयार करून सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कार्यशाळेसाठी अहिल्यानगर परिसरातील शिक्षक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



