देगलूर नाका परिसरातील रहमानीया कॉलनी, गाडेगाव रोड या भागातील ड्रेनेज लाईनसाठी खोदलेले सीसी रस्ते लोकांसाठी त्रासदायक आणि बोगस काम होत आहे
नागरिकांची महापालिकेकडे तक्रार

नांदेड – दि. २२ मे / देगलूर नाका परिसरातील रहमानीया कॉलनी, गाडेगाव रोड या भागातील ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी काही महिने आधी बांधले गेलेले सीसी (काँक्रीट) रस्ते पावसाच्या अगोदरच खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या पाऊस सुरू असताना या भागातील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पायी चालणाऱ्यांपासून ते दुचाकीधारकांपर्यंत सर्वच नागरिकांना रस्त्याच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
गुत्तेदारांनी चुकीच्या पद्धतीने आणि कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हे रस्ते उखडले असून, काम अपूर्ण ठेवले गेले आहे. हे काम बोगस होत आहे. चिकल मध्ये थातुर मतूर काम होत आहे. त्यामुळे या भागात चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती असल्यामुळे येत्या काळात आणखी त्रास वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करत लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. वेळेवर काम झाले नाही झाले तर पावसाच्या दिवसात शाळकरी मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
महापालिकेने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला जात आहे.



