मागील वर्षीच्या अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधितांना त्वरीत अनुदान वितरित करण्याची सामाजिक कार्यकर्ते अब्दुल वहिद यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नांदेड | प्रतिनिधी मिल्लत नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल वहिद यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देत मागणी केली होती की, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्वरीत अनुदान वितरित करण्यात यावे.
मागील वर्षी नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पार्श्वभूमीवर मनपा व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण करून बाधितांची यादी तयार केली होती. ही यादी जाहीर करण्यात आली आणि नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. मात्र फक्त एका व्यक्तीच्या आक्षेपामुळे यादीतील डुप्लिकेट नावे हटवण्यासाठी ती फेरतपासणीसाठी परत पाठविण्यात आली.
मनपाने फेरतपासणी करून ही यादी पुन्हा महसूल विभागाकडे दिली, मात्र अद्यापपर्यंत अनुदान वितरित झालेले नाही, आणि त्यामुळे अनेक गरजूंना वर्षभरानंतरही आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
दरम्यान, यावर्षी पुन्हा नव्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, जे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते अन्यायकारक आहे, कारण जुने सर्वेक्षण पूर्ण झाले असून नवीन प्रक्रिया उगाचच वेळखाऊ ठरत आहे.
लोक दोन-तीन दिवसांपासून मनपा आणि महसूल कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत, पण कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
अब्दुल वहिद यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पूर्वी झालेल्या सर्वेक्षणाला ग्राह्य धरून बाधितांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावे, जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकेल आणि नव्याने कोणताही अन्याय होणार नाही.
प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



