केंद्रीय विद्यालयात एनसीसी प्रमाणपत्र वितरण समारंभात विद्यार्थ्यांचा केला सन्मान

नांदेड:- उध्दव सरोदे – पी.एम श्री.केंद्रीय विद्यालय नांदेड येथे राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) मध्ये २ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि ‘ए’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्ससाठी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात एकूण JD (मुले) -१३ आणि JW (मुली) -८ कॅडेट्सना एनसीसी ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री.अशोक कुमार विश्वकर्मा हे होते तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. राम श्रृंगारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी कॅडेट्सना प्रमाणपत्रे देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अशोक कुमार विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात एनसीसीचे महत्त्व अधोरेखित करून म्हणाले की, “एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,नेतृत्व कौशल्य आणि देशभक्तीची भावना विकसित करते,हे प्रमाणपत्र केवळ कागदाचा तुकडा नाही तर कठोर परिश्रम,समर्पण आणि जबाबदारीचा पुरावा आहे.” यावेळी शाळेचे एनसीसी अधिकारी के.श्रीनिवास सर यांनी एनसीसीच्या उपक्रमांची आणि आगामी योजनांची माहिती सांगितली की,यावर्षी एनसीसी कॅडेट्सनी स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिर, पुतळा स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध सामाजिक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कॅडेट्सना संबोधित करताना शाळेच्या संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख गुलशन कुमार हंस सर म्हणाले की,”हे प्रमाणपत्र केवळ तुमचा आत्मविश्वास वाढवत नाही तर भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षा आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरेल.”प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण दिसून आले.यावेळी शाळेचे ग्रंथालय विभाग प्रमुख श्री.मितेश सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यासाठी विशेष सहकार्य केले.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्पित भावनेने योगदान दिले.आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



