ज्ञानमाता विद्या विहार शाळेत ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला

नांदेड: पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ज्ञानमाता विद्या विहार शाळेत ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘वन कॅडेट वन ट्री’ या अभिनव संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाचे उद्दिष्ट मातृत्वाचा सन्मान करणे तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे होते.
या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य फादर इगनाती, एनसीसी ऑफिसर विष्णु शिंदे, पालकवर्ग आणि शाळेतील एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून विविध प्रकारची झाडे लावली आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली.
प्राचार्य फादर इगनाती यांनी या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,
“पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळातील मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याची काळजी घेतली तर आपला परिसर हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राहील.”
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टीकोन, सामाजिक जबाबदारीची भावना आणि मातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रेरणा देण्यात आली. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांनी झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एनसीसी ऑफिसर विष्णु शिंदे यांनी केले.



