मिल्लत नगरमध्ये नागरिकांचा संताप; नाल्यांच्या सफाईसाठी उपआयुक्तांना निवेदन

नांदेड, दि. ४ ऑगस्ट- नांदेड शहरातील मिल्लत नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची अत्यंत दयनीय स्थिती असून त्यातून घाण व दुर्गंधी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर आज स्थानिक नागरिकांनी उपआयुक्त यांना निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली. या निवेदनामागे नांदेड दक्षिणचे आमदार बाळाजी कल्याणकर यांचे स्पष्ट निर्देश होते. त्यांच्या सूचनेनंतर महापालिका आयुक्त व उपआयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर महानगरपालिका अधिकारी तडवी, त्यांचे सहकारी (SI) झिया, तसेच माजी नगरसेवक अब्दुल रहीम यांनी परिसराचा पाहणी दौरा केला.
या दौर्यात मिल्लत नगरातील प्रमुख समाजसेवक शेख अब्दुल वहीद, अमजदभाई अब्दुल रऊफ, सिराजभाई पाशा, मौलाना रफीक मिस्त्री, वसीमभाई यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या समस्यांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि आरोग्याच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधले.
या दौऱ्यानंतर तडवी साहेब यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, उद्या ‘आस कॉलनी’त जेसीपी मशीनच्या सहाय्याने नाल्यांची खोदाई करून साफसफाई केली जाईल, तसेच नाल्यांवर औषध फवारणी करून दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवले जाईल.
स्थानिक नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले आणि प्रशासनाच्या तत्काळ प्रतिसादाचे स्वागत केले. मात्र त्यांनी ही मागणीही केली की, ही कारवाई एकदाच न होता नियमित स्वरूपात व्हावी, जेणेकरून परिसर स्वच्छ आणि रोगमुक्त राहील.



