नावघाट पुलावर सेफ्टी अँगल बसविण्याच्या मागणीला यश – शिवसेना (उठा) ने आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने घेतली दखल

नांदेड (प्रतिनिधी) : जुन्या नांदेड शहरातील अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नावघाट पूल हा रोज हजारो नागरिकांच्या वाहतुकीचा मार्ग आहे. मात्र पुलावर सुरक्षेची योग्य व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका कायम होता. विशेषत: येत्या ६ सप्टेंबर रोजी गणेश आनंद चतुर्दशी निमित्त भाविक आपल्या परिवारासोबत, लहान मुलांसह मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुकीसाठी या पुलावरून जाणार असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला होता.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपजिल्हा संघटक व प्रभाग क्र. १४ निरीक्षकगजानन साहेबराव हारकरे पाटील आणि कार्यकर्ते गणेश पेन्सिलवर यांनी प्रशासनाला ठामपणे मागणी करत सांगितले की, पुलावर तातडीने सेफ्टी अँगल बसविण्यात यावे. अन्यथा दिनांक ५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन तत्पर झाले आणि अखेर पुलावर सेफ्टी अँगल बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.
गजानन हारकरे पाटील यांनी स्पष्ट केले की, “जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न आमच्यासाठी सर्वोच्च आहे. आम्ही वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु वेळकाढूपणा केला गेला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच दखल घेण्यात आली. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी अँगल बसविणे अत्यावश्यक होते आणि ते आता सुरू झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळेल.”
गणेश पेन्सिलवर यांनीही सांगितले की, “गणेशोत्सव काळात हजारो नागरिक, लहान मुले व महिला पुलावरून जातात. अशा वेळी सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतली. आता सेफ्टी अँगल बसविल्याने अपघातांचा धोका कमी होईल.”
स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, “शिवसेनेने घेतलेली भूमिका आणि दबावामुळे प्रशासन हलले. यामुळे भविष्यात मोठा अनर्थ टळणार आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेना (उठा) च्या हस्तक्षेपामुळे जुन्या नांदेड शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, गणेशोत्सव विसर्जन काळातील सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.



