मदीना नगरमध्ये विजेचा धोका : तारा खाली लोंबकळल्याने नागरिक दहशतीत

नांदेड – देगलूर नाका, मदीना नगरातील मदीना हार्डवेअरच्या मागील गल्लीत वीज तारा अत्यंत खाली लोंबकळत आहेत. यामुळे गल्लीतील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, महिला व वयोवृद्ध यांची विशेषतः धास्ती वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या धोकादायक परिस्थितीची माहिती महावितरणला अनेकदा देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“कधीही हे तारे तुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे आम्ही प्राणघातक परिस्थितीत राहण्यास भाग पडलो आहोत. जर महावितरणने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन करू,” असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर एखाद्याचा जीव गेला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. त्यामुळे महावितरणने तात्काळ दखल घेऊन तारे उंचावण्याचे व सुरक्षित करण्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.



