श्री गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सवानिमित्त धार्मिक मिरवणूक चौकी – फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे द्वारे बिदरकडे यात्रेची तयारी

नांदेड, ता. ३० ऑक्टोबर: तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिब, नांदेड येथून श्री गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सव (प्रकाशपर्व) निमित्त विशेष धार्मिक मिरवणूक चौकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही चौकी दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजता *फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे द्वारे गुरुद्वारा नानकझीरा साहिब, बिदर येथे रवाना होणार आहे.
गुरुद्वारा बोर्डातर्फे यात्रेकरूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे क्रमांक ०७६१५ – ०७६१६ मध्ये यात्रेकरूंसाठी तिकिटांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक वातावरणाचा अनुभव अधिक पवित्र व्हावा यासाठी विशेष सलून (धार्मिक बोगी) लावण्यात आली आहे.
ज्या भाविकांना या पवित्र यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी दि. ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्थित राहावे. त्यानंतर सकाळी ०७:०५ वाजता तख्त सचखंड साहिब येथे अरदास होईल व त्यानंतर यात्रेची सुरुवात होईल.
ही चौकी दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुद्वारा नानकझीरा साहिब, बिदर येथे श्री गुरु नानक देव जी महाराज यांचा ५५६ वा प्रकाशपर्व अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करेल. समारंभानंतर चौकी दि. ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता बिदर रेल्वे स्टेशनहून परतीच्या प्रवासास निघेल आणि रात्री ०९:०० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
भाविकांना विनंती करण्यात येते की त्यांनी वेळेवर उपस्थित राहून, गुरुद्वारा बोर्डाच्या सूचनांचे पालन करावे आणि या पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा.



