पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याने आणि सर्वेक्षण न झाल्याने काँग्रेसकडून उपोषणाचा इशारा

नांदेड, दि. ३० ऑक्टोबर (प्रतिनिधी): नांदेड शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरगुती साहित्य व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक पूरग्रस्तांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही, अशी तक्रार समोर आली आहे. या संदर्भात आज काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आर.डी.सी. अजय अम्बीकर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अलीकडील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि ज्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा नागरिकांना तत्काळ शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच, ज्यांचे सर्वेक्षण अजून झालेले नाही, त्या खऱ्या पूरग्रस्तांचेही सर्वेक्षण करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रतिनिधींनी इशारा दिला की, जर प्रशासनाने पूरग्रस्तांना नुकसानभरपाईची रक्कम लवकर न दिल्यास आणि सर्वेक्षणाचे काम पूर्ण न केल्यास, काँग्रेस पक्ष दि. ३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करेल.
या प्रतिनिधीमंडळात माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, अब्दुलगफार, माजी नगरसेवक अब्दुल लतीफ, अॅड. मोहम्मद नासिर, सय्यद शेर अली, बाबुभाई खोकेवाले, रहीम अहमद खान, अब्दुल अजीज कुरेशी, अब्दुलहबीब बागवान, सय्यद फसीहुद्दीन, शेख जावेद चाऊश, सय्यद शुऐब हुसैन, अॅड. शहबाज, रमेश गोडबोले, अब्दुलहबीब बावझीर, अब्दुल वहाब, अब्दुल मुख्तार, अब्दुर्रहिम, मुन्तजबुद्दीन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



