राजकारणातील ‘निष्कलंक’ पर्व : आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर

भारतीय राजकारणातील एक निष्कलंक, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाचे प्रतीक असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने (जन्म: १२ ऑक्टोबर १९३५ – मृत्यू: १२ डिसेंबर २०२५) देशाच्या राजकीय क्षितिजावर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या ‘सुसंस्कृत, मूल्यनिष्ठ आणि निष्कलंक’ राजकीय प्रवासाने त्यांनी एक असा आदर्श निर्माण केला, जो येणाऱ्या प्रत्येक राजकीय पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.

नेतृत्वाचा प्रवास
नगराध्यक्षपदापासून पंजाबचे राज्यपाल या सर्वोच्च पदांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा चारित्र्यनिष्ठ नेतृत्वाचा एक वस्तुनिष्ठ, पण हृदयस्पर्शी अध्याय आहे. प्रमुख राजकीय टप्पे म्हणून लातूरचे नगराध्यक्ष म्हणून १९६६ मध्ये सुरू झालेली त्यांची सार्वजनिक कारकीर्द देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचली. नगराध्यक्ष, लातूर १९६६ ते १९७०, आमदार, लातूर १९७२ ते १९८०, विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र १९७८ ते १९७९, लोकसभा सदस्य, लातूर, १९८० ते २००४ (सात वेळा), लोकसभा सभापती (स्पीकर),१९९१ ते १९९६, केंद्रीय गृहमंत्री २००४ ते २००८, राज्यपाल, पंजाब २०१० ते २०१५ असा राहीला आहे.
मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यात त्यांच्यावर एकही आरोप, राजकीय डाग किंवा भ्रष्टाचाराचे शिंतोडे लागू दिले गेले नाहीत. त्यांनी कायम मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक म्हणून स्वतःला सिद्ध केले. गांधी परिवाराचे निकटवर्तीय असूनही, त्यांनी कधीही आपल्या पदाचा वा अधिकाराचा गैरवापर केला नाही. २००४ मध्ये पराभूत झाल्यानंतरही त्यांचा राजकीय प्रभाव कायम राहिला, जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खोली दर्शवतो.
संसदीय परंपरांचे जनक
आदरणीय शिवराज पाटील साहेब यांनी संसदेत आणि विधिमंडळात एक आदर्श राजकीय संस्कृती रुजवली. लोकसभा सभापती म्हणून (१९९१-१९९६) त्यांनी निर्माण केलेल्या नवनवीन संसदीय परंपरा, नियमांचे काटेकोर पालन आणि सभागृहातील शिस्तयाकडे आजही आदराने पाहिली जाते.
मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व मोठे होते. त्यांच्या विचारमंथनातून आणि मांडणीतून विषयाची सखोलता, संतुलन आणि विवेक दिसून येई. राजकारणात कुरघोडी करणे किंवा विरोधकांवर टीका करणे त्यांनी कटाक्षाने टाळले. त्यांनी विरोधकांसाठीही कधीही अपशब्द वापरले नाहीत, ज्यामुळे त्यांचा संवाद कायम सभ्य आणि शिस्तबद्ध राहिला. विरोधकांसोबतही राखलेला शिस्तबद्ध आणि सभ्य संवाद हा त्यांच्या नेतृत्वाचा दुर्मिळ गुण होता. त्यांच्या या गुणांमुळेच भारतीय लोकशाही व्यवस्थेला शांत, संयमी आणि कणखर नेतृत्व प्राप्त झाले.
लातूरच्या विकासाचे प्रणेते
आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचे कार्य केवळ दिल्लीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी लातूर आणि मराठवाड्याच्या राजकीय घडामोडींना नवी दिशा दिली. लातूरचे नगराध्यक्ष असताना त्यांनी शिवछत्रपती वाचनालयासारख्या ज्ञान-उपक्रमांची पायाभरणी केली. तसेच, शहर विकासाचे अनेक दूरदृष्टीचे प्रकल्प राबवले, ज्यामुळे लातूरच्या विकासाचा प्रारंभ झाला. ते लिंगायत समाजातून आले असले तरी, त्यांनी स्वतःला कधीही एका जातीपुरते मर्यादित ठेवले नाही. सर्वधर्म समभावाचे पालन करतानाच, लातूरमधील सर्व समाज घटकांत त्यांचे मोठे आदराचे स्थान होते.
लातूरच्या राजकारणात आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय विलासराव देशमुख आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख या नेत्यांमुळे उच्च मूल्यांची परंपरा निर्माण झाली. आज या माध्यमातूनच जिल्ह्यात सहकार, शिक्षण, सिंचन, उदयोग, रेल्वेसह पायाभुतसुवींधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली.
लोकशाहीतील अमूल्य योगदान
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी ११ व्या लोकसभेचे सभापती (स्पीकर) म्हणून कार्य केले. त्यांची भूमिका केवळ सभागृहाचे कामकाज चालवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी भारतीय संसदीय लोकशाहीत शिस्त, संयम आणि नवीन परंपरा रुजवली.
· उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार: देशाच्या लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि सदस्यांना त्यांच्या संसदीय कार्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळावी म्हणून, १९९२ मध्ये त्यांनी ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची’ सुरुवात केली.
· नवीन संसद भवनाची कल्पना: सध्याच्या संसद भवनाची व्याप्ती आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, मा. चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना नवीन संसद भवनाच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला होता. विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा सभापती या दोन्ही पदांवर असताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही संसदीय कामकाजात उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जातात.
नैतिकतेचा सर्वोच्च मापदंड (गृहमंत्रीपदाचा राजीनामा)
सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांचा अनुभव ओळखून त्यांना राज्यसभेवर घेतले आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय गृहमंत्री हे अत्यंत महत्त्वाचे पद दिले. या काळात त्यांनी अंतर्गत सुरक्षा आव्हानांना शांतपणे तोंड दिले. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसणे, हे त्यांच्या चारित्र्यसंपन्न नेतृत्वाचे प्रमाण आहे.
आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या कार्यकाळात, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या गंभीर राष्ट्रीय घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत, त्यांनी हल्ल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, ३० नोव्हेंबर २००८ रोजी, गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजकारणात सर्वोच्च पदावर असताना नैतिकतेचे मूल्य जपत राजीनामा देण्याचा हा निर्णय त्यांच्या चारित्र्यनिष्ठ नेतृत्वाचा आणि उच्च राजकीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा दाखला आहे.
१२ डिसेंबर २०२५ रोजी, वयाच्या ९० व्या वर्षी, लातूरमधील देवघर निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गृहमंत्री, लोकसभा सभापती आणि राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय देशासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत. आपल्याला सोडून गेले तरी भारतीय राजकारणातील एक ‘निष्कलंक आणि ऋषितुल्य’ पर्व आपल्या सोबत कायम राहील.
या निधनाने देशाने एक मार्गदर्शक नेता गमावला आहे. त्यांचे विचार, मूल्ये, उदाहरण आणि शिस्तप्रियता—हीच त्यांची खरी वारसा-ठेव आहे. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि चाकूरकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
राहुल हरिभाऊ इंगळे पाटील
मो. ९८९०५७७१२८



