हेल्थ

माता-बाल संगोपन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याची राज्यात आघाडी

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेमुळे ‘टॉप फाईव्ह’ मध्ये स्थान

 

नांदेड,१४- माता–बाल संगोपन, कुटुंब कल्याण व नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (HMIS) अंतर्गत माहे ऑक्टोबर २०२५ अखेर झालेल्या कामकाजाचा राज्यस्तरीय अहवाल १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यानुसार जिल्हा व महानगरपालिका निहाय गुणांकन जाहीर करण्यात आले आहे.
या अहवालात नांदेड जिल्ह्याने माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल महाराष्ट्र शासनाचे कुटुंब कल्याण, माता–बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सागळे (आरोग्य सेवा, पुणे) यांनी पत्राद्वारे प्रसिद्ध केला आहे.

माता आरोग्य कार्यक्रमातील ठळक बाबी

गर्भवती महिलांची १२ आठवड्यांपूर्वी नोंदणी, प्रसूतीपूर्व चार तपासण्या, मातांचे लसीकरण, आयर्न–फॉलिक अ‍ॅसिड (IFA) १८० गोळ्यांचे वितरण, अतिजोखमीच्या व तीव्र रक्तक्षय असलेल्या गर्भवतींची ओळख व उपचार, तसेच प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्याचे प्रमाण या सर्व निर्देशांकांमध्ये नांदेड जिल्ह्याने उद्दिष्टानुसार समाधानकारक कामगिरी केली आहे.

बाल आरोग्य कार्यक्रम- जिवंत जन्म नोंदणी प्रभावीपणे करण्यात आली असून २.५ किलोपेक्षा कमी वजनाने जन्मलेल्या बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

प्रभावी नियोजन व थेट सनियंत्रण- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख यांनी सखोल नियोजन करून संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत केली. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तांडा–वाडी, वस्त्या, वीटभट्ट्या, साखर कारखाने आदी ठिकाणी अचानक भेटी देऊन थेट सनियंत्रण करण्यात आले. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सेवा मिळते की नाही, याची खातरजमा करण्यात आल्याने जिल्ह्याची कामगिरी अधिक भक्कम झाली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हे यश एकट्याचे नसून, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीवरील आरोग्य कर्मचारी, अधिकारी व संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. आगामी काळात राज्यात अधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे देण्यात येईल. – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *