नवा मोंढा, नांदेड येथील शासकीय गोदामाच्या जागेवरील खोदकामामुळे नागरिकांमध्ये भीती; खोब्रागडे नगरातील घरांचे मोठे नुकसान

नांदेड | शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या शासकीय गोदामाच्या जागेवर सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकाम व बांधकामामुळे परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या खोदकामाचा थेट परिणाम लगतच्या खोब्रागडे नगरातील रहिवासी भागावर झाला असून, काही घरांसमोरील जमीन अचानक खचल्याने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खोदकामामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले असून, काही ठिकाणी फरशी उखडली आहे. काही कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात घराबाहेर पडावे लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या गंभीर घटनेबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामाची चौकशी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, अशोक पाटील उमरेकर, गणेश तादलापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई द्यावी, तसेच संबंधित ठेकेदार व बांधकाम संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी सदर बांधकाम तात्पुरते थांबवून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



