महानगरपालिका निवडणुकीत मतदारांचा गोंधळ
मतदान प्रक्रियेत त्रुटी; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

अलीकडे पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. मतदार याद्यांतील त्रुटींमुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.

एका कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदविण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागांत, तर तीन सदस्यांची नावे तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेकांना मतदान न करताच परतावे लागले.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच वाहनाची सुविधा नसलेल्या मतदारांना बसला. परिणामी, जागरूक मतदार किंवा स्वतःची वाहतूक व्यवस्था असलेलेच मतदार मतदान करू शकले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्यास या गोंधळाचा मोठा वाटा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाने मतदारांना वेळेत मतदान केंद्र, बूथ क्रमांक किंवा पोल चिटसारखी किमान माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले. या परिस्थितीचा अप्रत्यक्ष फायदा आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर तरी प्रशासनाने या गंभीर त्रुटींची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करणे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच मतदान केंद्रावर ठेवणे आणि मतदारांना स्पष्ट व अचूक माहिती उपलब्ध करून देणे या सुधारणा तातडीने राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
वार्ड क्रमांक 17 मधील अनेक मतदारांना हा अनुभव आलेला असून, ही समस्या केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहरातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे चित्र आहे. लोकशाही बळकट करायची असेल, तर मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि मतदारकेंद्रित करणे गरजेचे आहे, अन्यथा मतदानाचा अधिकार केवळ कागदापुरताच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.



