नांदेड : पोलीस भरतीत पैसे मागितल्याप्रकरणी पोलीस अंमलदार निलंबित

नांदेड, दि. 14 मार्च – नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिक तसेच पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, प्रामाणिक व गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे पैशांची देवाणघेवाण अथवा गैरप्रकारास अजिबात स्थान नसून अशा प्रकारच्या प्रकरणांवर पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने कारवाई करत आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या काही उमेदवारांना एका पोलीस अंमलदाराने भरतीमध्ये मदत करतो असे सांगत मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ संक्षिप्त चौकशी केली. या चौकशीत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे (ब. नं. 2163), नेमणूक पोलीस मुख्यालय, नांदेड यांनी उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा, गैरशिस्तीचा व भ्रष्टाचारास प्रवृत्त करणारा असल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 25 व मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम 1956 मधील नियम क्र. 3 (1-A) (i) (a) अन्वये संबंधित पोलीस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे यांना 14 मार्च 2026 रोजी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तसेच त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, नांदेड जिल्हा पोलीस दलाने सर्व पोलीस भरती उमेदवारांना आवाहन केले आहे की, भरती प्रक्रियेत निवड ही केवळ शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व इतर अधिकृत निकषांनुसार गुणवत्तेच्या आधारे केली जाते. कोणतीही व्यक्ती पोलीस भरती करून देण्याचे आमिष दाखवत किंवा ओळखीच्या नावाखाली पैसे मागत असल्यास अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.
तसेच कोणतीही व्यक्ती किंवा मध्यस्थ पोलीस भरतीसाठी पैसे मागत असल्यास किंवा अशा प्रकारचा संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा नांदेड जिल्हा पोलीस कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी व उमेदवारांनी अफवा, चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. पोलीस भरती प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती केवळ शासन व पोलीस प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांद्वारेच घ्यावी, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल.



