वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधी सोबत नांदेड महापौरांची बैठक संपन्न
मित्रा व वर्ल्ड बँकेच्या संयुक्त उपक्रमातुन महापालिकेस निधी प्राप्तीसाठी प्रयत्न

नांदेड, ०८ मे : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जागतिक बँक (World Bank) आणि मित्रा (MITRA – Maharashtra Institution for Transformation) यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाचा निधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाबाबत नांदेडच्या महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शहर अभियंता सुमंत पाटील, वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी श्रीनिवासराव, अभिजित रॉय, श्रेष्ठा आने आदी उपस्थित होते.
‘मित्रा’ (MITRA) आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या महा-स्ट्राईड (MahaSTRIDE) आणि महाराष्ट्र लवचिकता विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत हा निधी दिला जाणार आहे. या निधीचा वापर मुख्यत्वे शहरातील पाणीपुरवठा योजना (पाण्याचा पुर्नरवापर), रस्ते विकास आणि मलानिसारण प्रणालीतील उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जाईल. ‘मित्रा’ ही संस्था या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी (प्रकल्प व्यवस्थापन युनिट) म्हणून काम करणार आहे.
महापौरांनी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रलंबित विकासकामांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा पुर्नरवापर, रस्ते विकास, मलनिस्सारण अंतर्गत येणाऱ्या कामांचा प्रकल्प अहवाल तयार करुन निधी प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले. या सहकार्यामुळे नांदेड महापालिकेच्या आर्थिक स्थितीसह शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित असून, नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध होणार आहेत.



