किनवट : जुन्या वादातून मजुराचा दगड व काठ्याने ठेचून निर्घृण खून; आरोपी अटकेत

किनवट (प्रतिनिधी) – जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर २९ वर्षीय मजुराने २६ वर्षीय तरुण मजुराचा दगड व काठीने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना किनवट शहरातील सुभाषनगरात शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) रात्री घडली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीस अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुभाषनगरातील सलमान खान रशिद खान पठाण याचे काही दिवसांपूर्वी समीर इब्राहिमशाह शेख याच्याशी वाद झाले होते. जुन्या वादाचा राग मनात ठेवून शुक्रवारी रात्री १० ते १०.४० च्या सुमारास समीर शेख रस्त्याने जात असताना सलमान खान याने त्याच्यावर दगडाने डोक्यात प्रहार केला आणि काठ्याने मारहाण करत त्याचा निर्दयपणे खून केला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रजियाबी इब्राहिम शेख यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. शनिवारी (दि. १९ एप्रिल) पोलिसांनी आरोपी सलमान खान पठाण याला सुभाषनगरमधील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रविवारी (दि. २० एप्रिल) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासिक पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




