चौफाळा ते बिलाल नगर मुख्य रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

नांदेड, १७ मे २०२५: — प्रतिनिधी, नांदेड चौफाळा ते बिलाल नगर दरम्यान सुरू असलेले मुख्य रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असून गेल्या वीस दिवसांपासून काम पूर्णपणे बंद आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचार्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काल रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या मधोमध पाणी साचले असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची झाकणे उघडी असून त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
ठेकेदाराच्या मनमानीमुळे रस्त्याचे काम रखडले असून कोणतीही तांत्रिक यंत्रणा लक्ष देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. अर्धवट उखडलेला रस्ता, उघडी झाकणे, वर्दळीचा मार्ग आणि त्यातच साचलेले पाणी – यामुळे रोजच अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी मनपाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.




