मिलत नगर, देगलूर नाका परिसातील पावसानंतर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त – नाल्यांच्या अभावामुळे समस्या गंभीर

नांदेडच्या देगलूर नाका परिसरातील मिलत नगर भागात असलेल्या अब्बासी मस्जिद , अकबरी मस्जिद आणि आजूबाजूच्या रहिवासी भागात नुकत्याच झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, घरसुध्दा पाण्याखाली गेली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
रहिवाशांनी सांगितले की, या भागात पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही नालीची सोय नाही. परिणामी गल्ल्या आणि मोकळी जागा ही जणू जळीतील तलावात रूपांतरित झाली आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि रोजच्या फिरणाऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच, स्थानिकांनी सांगितले की, महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली आहेत, आणि माजी नगरसेवकांनीदेखील या भागाकडे दुर्लक्षच केले आहे. निवडणुकीच्या वेळेस मत मागायला येणारे हे लोक, समस्या समजून घेण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी कधीच येत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, नाल्यांची उभारणी व पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“मत मागायला सगळे येतात, पण समस्या ऐकायला कोणीच नाही!” – मिलत नगरच्या नागरिकांची व्यथा.



