हेल्थ
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती;
28 मे रोजी आरोग्य शिबिरे, संवाद सत्रे, प्रबोधन कार्यशाळांचे आयोजन

नांदेड, 26- मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या समन्वयाने हे उपक्रम राबवले जातील.
मुली व महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेली मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, समाजात अजूनही याबाबत गैरसमज व अज्ञान आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाळा व गाव पातळीवर किशोरवयीन मुली व महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, संवाद सत्रे, आरोग्य शिबिरे, प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना निर्देश दिले आहेत की, पाळीविषयी मौन तोड’ या दृष्टिकोनातून खुला संवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन व योग्य सवयी यांचा प्रसार करावा.
मासिक पाळीचे चक्र काय असते?दर महिन्याला स्त्री बीजग्रंथीत बीज तयार होते. गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाचे अंतःस्तर झाडले जाते व रक्तस्त्राव होतो. ही प्रक्रिया चार-पाच दिवस चालते. नंतर नव्या बीज निर्मितीने नवे चक्र सुरू होते.
पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजीदररोज स्वच्छ आंघोळ करणे, सॅनिटरी नॅपकिन वेळेवर बदलणे, वापरलेल्या नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट लावणे, त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे, आशा सेविकांकडे सॅनिटरी नॅपकिन्स माफक दरात उपलब्ध आहे.
किशोरवयात योग्य मार्गदर्शनाची गरजया वयात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असल्याने योग्य मार्गदर्शन, लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन गरजेचे आहे. या उपक्रमांमधून मुलींना शास्त्रीय व समुपदेशनात्मक माहिती दिली जाणार असून, याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.



