डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत सरकारच्या तृतीयपंथी कल्याण धोरण तयार करण्यासाठीच्या ‘कोर एक्स्पर्ट ग्रुप’मध्ये निवड

नांदेडच्या डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या तृतीयपंथी कल्याण धोरण तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर एक्स्पर्ट कमिटीमध्ये प्रतिष्ठेची निवड झाली आहे. या समितीत देशातील विविध राज्यांतील प्रमुख तज्ज्ञांचा समावेश असून, डॉ. जेठवाणी या समाज समावेशन व कल्याण विषयक समुदाय तज्ज्ञ म्हणून कार्य करतील. डॉ. जेठवाणी या सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, प्रमुख प्रवक्त्या – आंतरराष्ट्रीय किन्नर अखाडा आणि अध्यक्ष – सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड आहेत. तृतीयपंथी हक्क, संधी व कल्याण यासाठी गेली अनेक वर्षे त्यांनी सातत्याने लढा दिला आहे.
महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांसाठी २०२४ मध्ये तयार झालेल्या तृतीयपंथी धोरणात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तृतीयपंथींसाठी शासकीय नोकरीत आरक्षण आणि पोलीस नोंदीत लिंग बदल परवानगी मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना ‘ट्रान्स मॅन’ म्हणून लिंग बदल परवानगी मिळवून देणारे राज्यातील पहिले प्रकरण त्यांनी घडवून आणले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व्यवहार संचालनालयाच्या माध्यमातून ‘इंद्रधनु’ – तृतीयपंथीय विशेष सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याचा पुढाकारही त्यांचाच आहे, जो आता दरवर्षी साजरा होतो. तृतीयपंथी बांधवांसाठी शैक्षणिक मदत,
रोजगार निर्मिती प्रकल्प आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, तसेच देश-विदेशात २०१७ पासून आठ वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. शिवाय, जैव विघटनक्षम पॅकेजिंग युनिट व प्लेट निर्मिती युनिटसारखे CSR प्रकल्प राबविण्याची त्यांनी पुढाकार घेतली आहे. डॉ. सान्वी जेठवाणी यांची ही निवड महाराष्ट्रातील तृतीयपंथी हक्क चळवळीच्या इतिहासात अभिमानास्पद ठरेल, अशी भावना विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.



