नांदेडमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक जिल्हाधिकारी व आयुक्तांना शहर काँग्रेस कमिटीचे निवेदन


नांदेड – शहरात व प्रभागात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेकडो कुटुंबांना घरगुती साहित्य, अन्नधान्य, वस्त्र तसेच आर्थिक फटका बसला आहे. नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, या गंभीर परिस्थितीत नांदेड शहर काँग्रेस कमिटी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या –
पूरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी.
शहरातील परिस्थिती पाहता गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा.
मागील अतिवृष्टीतील नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी.
या निवेदनादरम्यान उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पावडे, नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, तसेच प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, नागरिकांना तातडीने दिलासा न दिल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून नागरिकांना मदत पुरवावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.
निवेदन दिल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पूरग्रस्त भागालाही भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचलेले असल्याने आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या गंभीर बनत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नागरिकांनी काँग्रेस नेत्यांकडे तातडीने मदतीची मागणी केली असून, या मागण्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
–



