नावघाट ब्रिजवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
सेफ्टी अँगल तात्काळ बसवा; अन्यथा ५ सप्टेंबरला तीव्र आंदोलन – शिवसेनेचा इशारा

गणेश विसर्जनावेळी हजारो भाविकांचा जीव धोक्यात; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी – हारकरे पाटील
नांदेड (प्रतिनिधी) : जुन्या नांदेड शहरातील गोदावरी नदीवरील नावघाट ब्रिज हा परिसरातील प्रमुख मार्ग असून, गणेश विसर्जनावेळी हजारो भाविकांचा येथे मोठा जमाव उसळतो. परंतु पुलावर सुरक्षेची कोणतीही भक्कम व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचा धोका सतत निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या पुलावर सेफ्टी अँगल व संरक्षणात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा संघटक गजानन साहेबराव हारकरे पाटील व प्रभाग क्रमांक १४ निरीक्षक, गणेश गणेश पेन्सिलवर यांनी केली आहे.
भाविकांच्या जीविताला धोका
६ सप्टेंबर रोजी गणेश आनंद चतुर्दशी निमित्त विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येने कुटुंबासह व लहान मुलांसह नदीकाठावर येतात. गर्दीच्या वेळी ढकलाढकली होण्याचा धोका असतो. पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक ते सुरक्षा अँगल, जाळी किंवा संरक्षणात्मक दारे नसल्यामुळे चुकून पाय घसरल्यास नदीत पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भाविकांच्या जीविताला गंभीर धोका आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
आजवर वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. भाविकांचा जीव धोक्यात घालणारी ही बेफिकिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला. “भाविक सुरक्षित राहिले पाहिजेत, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास उद्भवणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार राहील,” असे हारकरे पाटील यांनी स्पष्ट केले.
५ सप्टेंबरपर्यंत मुदत
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जर ५ सप्टेंबरपर्यंत नावघाट ब्रिजवर सेफ्टी अँगल बसवण्याचे काम पूर्ण झाले नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल.”
नदीकाठावरील सुरक्षेच्या या गंभीर प्रश्नावर स्थानिक नागरिक, गणेश मंडळे व सामाजिक संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. आता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावर सुरक्षाव्यवस्था बसवली तरच आगामी गणेश विसर्जन सुखरूप होईल, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे.



