अवैध घातक शस्त्र बाळगून बाजारात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद


नांदेड (प्रतिनिधी): नांदेड ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध घातक शस्त्र बाळगून बाजारात दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक करून एक लोखंडी खंजर जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीतीची लाट शमली आहे.
अटक आरोपींची नावे: रणज्योतसिंग उर्फ बच्चुसिंग सतनामसिंग बावरी (वय 19 वर्षे), रा. गोविंद कॉलनी, ता. जि. नांदेड., सय्यद सलमान उर्फ भुऱ्या सय्यद बाबुमियां, रा. एन.डी. 24, फिरदोस नगर, हडको, ता. जि. नांदेड.
जप्त मुद्देमाल: एक लोखंडी खंजर.
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या इसमांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सिडको येथील गुरुवार बाजार परिसरात दोन गुन्हेगार खंजराचा धाक दाखवून दुकानदार, व्यापारी व शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने तत्काळ गुरुवार बाजार येथे धाव घेत आरोपी रणज्योतसिंग उर्फ बच्चुसिंग सतनामसिंग बावरी आणि सय्यद सलमान उर्फ भुऱ्या सय्यद बाबुमियां यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी खंजर हस्तगत करण्यात आला. तपासात समोर आले की आरोपी रणज्योतसिंग याच्यावर पूर्वीपासूनच खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि अवैध शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी या वेळेवरच्या कारवाईमुळे गंभीर गुन्हा होण्यापासून प्रतिबंध घातला आहे.
कारवाईनंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर आणि त्यांच्या पथकाने आरोपींना बाजार परिसरात फिरवून, पोलीस व्हॅनवरील पी.ए. सिस्टीमद्वारे जनतेस आवाहन केले की —
“कोणताही इसम किंवा गुन्हेगार बाजारात दहशत निर्माण करून शेतकरी, व्यापारी किंवा दुकानदारांकडून बळजबरीने पैसे मागत असेल किंवा लुटण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळी घाबरू नका. तात्काळ 112 किंवा 100 या क्रमांकावर अथवा पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे संपर्क साधा.”
पोलीसांनी बाजार परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांनी केले आहे.



