इंटरसिटी ट्रेनमध्ये रक्तरंजित खून! प्रवाशांमध्ये भीतीचं सावट – उमरी-धर्माबाद मार्गावर घडली थरारक घटना

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड विभागातील उमरी–धर्माबाद रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आज घडलेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रवासादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्दयपणे खून करण्यात आला असून, या घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव आतिश हायबते (वय अंदाजे २५ वर्षे) असं असून, तो इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या विकण्याचं काम करत होता. सोमवारी सकाळी ट्रेन उमरी–धर्माबाददरम्यान धावत असताना, आतिशचा एका प्रवाशाशी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद इतका चिघळला की त्यातून हातघाई झाली आणि आरोपीने धारदार शस्त्राने वार करून आतिशचा जागीच खून केला.

घटनेनंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये आत्यंतिक घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. ट्रेन पुढील स्थानकावर थांबताच जीआरपी आणि आरपीएफ पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली.
रेल्वे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, प्रवाशांचे जबाब आणि ट्रेन स्टाफच्या माहितीच्या आधारे तपास जलदगतीने सुरू केला आहे.
या हत्याकांडामुळे नांदेड परिसरात भय आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. “ट्रेनमध्ये प्रवास करणं आता धोक्याचं झालं आहे,” अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे कठोर सुरक्षाव्यवस्था आणि नियमित गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मृत आतिश हायबते हा अत्यंत मेहनती तरुण असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले. रोजीरोटीच्या शोधात तो रेल्वे गाड्यांमध्ये बाटल्या विकत होता. पण एका क्षणिक वादाने त्याचे आयुष्य संपले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
घटनेचा तपास सुरू असून, रेल्वे पोलिसांनी आश्वासन दिले आहे की आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल. या घटनेने नांदेड विभागात पुन्हा एकदा रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.



