माहूर तालुक्यात धक्कादायक दुहेरी खून : कापूस वेचणीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांचा गळा आवळून खात्मा


नांदेड/माहूर : माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचत असताना दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलांची नावे अंतकलाबाई अशोक आढागळे (वय ६०) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (वय ४५) अशी आहेत. दोघीही गुरुवारी नेहमीप्रमाणे शेतात कापूस वेचणी करत होत्या. त्याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने दोघींवर हल्ला करून त्यांचा गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून तपासाची दिशाहोरणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे लूटमारीचा हेतू असावा, असा अंदाज वर्तवला जात असला तरी पीडित महिलांच्या कानातील व पायातील दागिने मात्र तसेच असल्याने हा खून केवळ दागिन्यांसाठी झाला का? याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

तसेच एका महिलेच्या अंगावरील कपड्यांची स्थिती पाहता अतिप्रसंगाचाही संशय पुढे येत असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या सर्व अँगलमधून शोध घेत तपास गतीमान करण्यात आला आहे.
दुहेरी खून उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“दुहेरी खुनाचा तपास जलदगतीने करण्यात येत आहे. विविध पथके तयार करून त्यांना शोधमोहीमेवर पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी तांत्रिक तपास, फॉरेन्सिक पथक व डॉग स्कॉडची मदत घेतली जात आहे. सर्व शक्यता तपासल्या जात असून गुन्हेगारांना लवकरच गजाआड केले जाईल.”



