परभणी जि. प. गटनेता बदलाचा डाव उधळणार?
काँग्रेस प्रदेश नेतृत्व मैदानात ;जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत
परभणी, दि. ८ मे : परभणी जिल्हा परिषदेमधील काँग्रेस पक्षाच्या गटनेता बदलाच्या हालचालींवर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत हरकत नोंदविली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात विद्यमान गटनेता श्री. अजित वरपूडकर यांना बदलण्यासंदर्भात देण्यात आलेल्या पत्राचा विचार करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या दि. ५ मार्च २०२६ च्या आदेशानुसार परभणी जिल्हा परिषदेमध्ये श्री. अजित अनिलराव वरपूडकर व श्री. जितेंद्र गोपाळ देशमुख यांचा काँग्रेस पक्षाचा गट स्थापन झाला असून श्री. अजित वरपूडकर हे अधिकृत गटनेता आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्या श्रीमती ज्योत्सना घाटगे या काँग्रेस गटामध्ये सामील नसल्याचा दावा देखील निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष श्री. बाबाजानी दुर्राणी यांनी गटनेता बदलण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र दिल्याची माहिती प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. मात्र हे पत्र देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसून, गटनेता बदलण्याचा निर्णय घेण्याचा अथवा त्यासंदर्भात पत्र देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार श्री. दुर्राणी यांना नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ व नियम १९८७ मधील तरतुदींचा उल्लेख करत अशा पद्धतीने गटनेता बदलता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या घटना व नियमावलीतील अनुक्रमांक ८ व ९ नुसार कोणत्याही पक्षनेता, उपपक्षनेता अथवा पक्ष प्रतोद यांची जागा रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवीन निवड ही पक्षाच्या मार्गदर्शक व नियंत्रक समितीचे प्रमुख मा. जनरल सेक्रेटरी (ऑर्गनायझेशन) तथा वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेऊन ठरावाद्वारे करण्यात येणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात अशाप्रकारची कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच जिल्हा परिषद सदस्या श्रीमती ज्योत्सना गणेशराव घाटगे या अद्याप काँग्रेस पक्षाच्या अधिकृत गटामध्ये सामील झालेल्या नसून त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमार्फत गटामध्ये सामील होण्याबाबत नोटीस देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्वतंत्र नवीन गट तयार करणे अथवा विद्यमान गटनेता बदलणे ही बाब पूर्णतः बेकायदेशीर व पक्षविरोधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली असून, गटनेता बदलासंदर्भातील पत्राचा विचार करू नये व विद्यमान
गटनेत्यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.



