महिला वकिलांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा ऑल इंडिया लॉयर्स युनियनचा निषेध; कडक कारवाईची मागणी

बीड, १४ एप्रिल २०२५: अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील महिला वकील ॲड. ज्ञानेश्वरी अंजन यांच्यावर गावातील सरपंच आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून शेतात नेऊन काठ्या व लोखंडी पाईपने अमानुष मारहाण करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्र राज्य कडून तीव्र निषेध करण्यात आला आहे व संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवल्याने या हल्ल्याची पार्श्वभूमी निर्माण झाली. अंजन यांना धार्मिक स्थळावर लावण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या भोंग्यांमुळे आणि घराजवळील पिठ्या चक्क्यांमुळे मायग्रेनचा त्रास होत होता. त्यांनी सरपंचाकडे तक्रार केली होती, परंतु उपाययोजना न झाल्याने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतरही १४ एप्रिल रोजी सरपंच अनंत अंजन व इतर ९ जणांनी त्यांच्या घरात घुसून धमकी दिली आणि त्यांना शेतात नेऊन निर्घृण मारहाण केली.
या हल्ल्यात ॲड. अंजन गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या घरी परतल्या असल्या तरी, १८ एप्रिलपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी अजूनही फरार असून त्यांनी पुन्हा पिठ्या चक्क्या सुरू केल्या आहेत आणि अंजन यांच्या कुटुंबीयांना धमक्याही देत आहेत.
या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया लॉयर्स युनियनने राज्य सरकारकडे आणि पोलिस प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
-
आरोपी सरपंच व त्याच्या सहकाऱ्यांना त्वरित अटक करावी व कठोर कायदेशीर कारवाई करावी.
-
वकिलांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदा आणि यंत्रणा निर्माण करावी.
-
या प्रकरणाचा निष्पक्ष व तातडीने तपास करून न्यायालयीन शिक्षा सुनावण्यात यावी.
-
ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे.
हा प्रकार केवळ एका वकीलावरचा हल्ला नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवरच आघात आहे.
ॲड. बाबासाहेब वावळकर (अध्यक्ष), ॲड. चंद्रकांत बोजगर (महासचिव) ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्र राज्य



