पैशांच्या वादातून तेलंगणातील महिलेचा खून
मृतदेह किनवट तालुक्यातील सारखणी घाटात टाकल्याची कबुली; दोघे अटकेत

किनवट (प्रतिनिधी) : मकरसंक्रांतीच्या दिवशी किनवट तालुक्यातील सारखणी घाट परिसरात आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला असून, सदर महिला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैशांच्या वादातून तिचा खून करून मृतदेह महाराष्ट्रातील किनवट तालुक्यात आणून टाकल्याची कबुली दोन आरोपींनी दिली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

दि. १४ जानेवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सारखणी घाट परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाची परिस्थिती पाहता खून करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तपासादरम्यान सदर मृतदेह हा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील पित्तलवाडा येथील इमराना जबीन (वय ३८) हिचा असल्याचे स्पष्ट झाले.
प्राप्त माहितीनुसार, इमराना जबीन ही मागील दोन महिन्यांपासून तिची बहीण समीना यास्मिन हिच्याकडे दासनापूर (जि. आदिलाबाद) येथे राहत होती. सुमारे एक वर्षापूर्वी तिने इंद्रवेल्ली येथील मोहम्मद फारुख खान याला तिच्या नावावर अंदाजे पाच लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून आणखी चार लाख रुपये दिले होते. दरम्यान, इमरानाचा विवाह ठरल्याने तिने पैसे परत मागितले असता फारुख खान याने टाळाटाळ केली. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी फोनवरून पैसे मागितल्यावर त्याने स्पष्ट नकार दिल्याने इमराना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली.

दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून इमरानाचा मोबाईल बंद झाला, तसेच ती राहत असलेले घर कुलूपबंद अवस्थेत आढळले. मात्र तिची अॅक्टिव्हा दुचाकी घरासमोरच उभी असल्याने संशय बळावला. अखेर मावळा पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली होती.
बेपत्ता प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दि. १४ जानेवारी २०२६ रोजी मावळा पोलिसांनी मोहम्मद फारुख खान व रमेश या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी कबुली दिली की, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ते दुचाकीवरून पित्तलवाडा येथे गेले होते. पैशांच्या वादातून इमराना व फारुख यांच्यात भांडण झाले आणि त्याच वादातून इमरानाचा खून करण्यात आला.
खून केल्यानंतर फारुख खान याने कार भाड्याने घेऊन इमरानाचा मृतदेह आदिलाबादहून इचोडा–सोनाळा मार्गे किनवट येथे आणला व नंतर सारखणी घाट परिसरातील जंगलात रस्त्याच्या कडेला दगड व मातीने झाकून मृतदेह टाकून दिल्याची माहिती आरोपींनी दिली.
दि. १४ जानेवारी रोजी मृतदेह आढळल्यानंतर तेलंगणातील मावळा पोलीस, सिंदखेड पोलीस, तहसीलदार व पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तसेच रिम्स रुग्णालय, आदिलाबाद येथील डॉक्टरांच्या पथकाकडून घटनास्थळीच शवविच्छेदन करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मृतदेह सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती मावळा पोलीस ठाण्याकडून अधिकृत पत्राद्वारे सिंदखेड पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



