क्राईम

तौहीद खान यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध – न्याय मिळालाच पाहिजे!

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडलेली तौहीद खान या तरुणाची निर्घृण हत्या संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना आहे. एका तरुणाचा इतक्या क्रूरपणे जीव घेतला जातो आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये संबंधित आरोपीकडून अभद्र धार्मिक टिप्पणी केल्याचे, तसेच या घटनेबद्दल कोणताही पश्चात्ताप नसून उलट अभिमानासारखी भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा जनमानसात सुरू आहेत. या रेकॉर्डिंगची सत्यता आणि त्यातील आशय तपास यंत्रणांनी वैज्ञानिक पद्धतीने पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

जर या रेकॉर्डिंगमधील बाबी तपासात सत्य आढळल्या, तर हा प्रकार केवळ खुनाचा गुन्हा म्हणून पाहून चालणार नाही. ही हत्या कोणत्याही विशिष्ट धार्मिक, जातीय, वैचारिक किंवा संघटित हेतूने घडवून आणली गेली आहे का, याचा सखोल तपास झाला पाहिजे. आरोपींची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे संपर्क, पूर्वीचे गुन्हे, समाजात द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तींशी संबंध आणि या घटनेमागील खरे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेतला गेला पाहिजे.

आज प्रश्न केवळ तौहीद खान यांच्या हत्येचा नाही, तर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे, याचा आहे. जर एखाद्या व्यक्तीला हत्या करून त्याचा पश्चात्ताप होत नसेल, तर ही मानसिकता समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रवृत्तींना वेळेवर आळा घातला नाही तर उद्या कोणत्याही निरपराध व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

त्यामुळे या प्रकरणात केवळ खुनाचा गुन्हा दाखल करून तपास मर्यादित ठेवू नये. तपासातून जे जे गंभीर पैलू समोर येतील त्यानुसार संघटित गुन्हेगारी आणि समाजविघातक कृत्यांशी संबंधित लागू होणाऱ्या सर्व कठोर कायदेशीर तरतुदींचा विचार करण्यात यावा. दोषींना वाचविण्याचा किंवा तपासाची दिशा बदलण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

राज्य शासनाने या प्रकरणासाठी तात्काळ अनुभवी आणि सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून अल्पावधीत निकाल लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा देत आहोत की, या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर कारवाई झाली नाही, तपासात दिरंगाई झाली, दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. न्यायासाठीचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. तौहीद खान यांना न्याय मिळालाच पाहिजे!
दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! सत्य बाहेर आलेच पाहिजे!
कायद्याचे राज्य अबाधित राहिलेच पाहिजे….

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *